परळी वैद्यनाथ (दि. 03) – परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत. क्रिकेट सह क्रीडा क्षेत्रातही परळीचे मोठे योगदान आहे. रणजी ट्रॉफीसाठी मराठवाड्याची स्वतंत्र टीम असली असती, तर परळी सह बीड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्याद्वारे आपली प्रतिभा राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली असती; ती संधी मिळावी म्हणून दरवर्षी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण क्रिकेट व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो. याही वर्षी आपण वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील या मैदानावर नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले, परंतु पुढील वर्षी ही स्पर्धा स्वतंत्र भव्य स्टेडियम मध्ये होईल; यासाठी राज्य शासनाने सुमारे 65 कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले असून परळीत येत्या काही महिन्यातच सुसज्ज असे क्रीडा संकुल उभे केले जाईल. त्यामध्ये क्रिकेटसह अन्य क्रीडा प्रकारातील खेळांनाही सुसज्ज असे मैदान उभे करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे बोलताना केली.
ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे मागील 25 जानेवारीपासून भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परळी शहर तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील 264 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा अंतिम सामना आज हजारो क्रिकेट प्रेमींच्या उत्साहात खेळवला गेला व त्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात धनंजय मुंडे बोलत होते. या समारंभास खास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंग तसेच बॉलिंग ची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला स्टार गोलंदाज जहीर खान यांची विशेष उपस्थिती होती. दोघांचेही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक तरुणांनी एकच जल्लोष करत आपल्या लाडक्या खेळाडूंचे जोरदार स्वागत केले.
आपल्या शरीरात वाढत असलेल्या कॅन्सरवर मात करून युवराज सिंग ने देशासाठी अनेक रेकॉर्ड स्थापित केले युवराज सिंग आज प्रथमच परळीत आले असता वैद्यनाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या चरणी युवराज सिंग यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.
मी देखील ग्रामीण भागातून टेनिस बॉल पासून क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली. हळूहळू संधी उपलब्ध होत गेली आणि देशासाठी खेळायची मला संधी मिळाली. ग्रामीण भागाच्या मातीतूनच योग्य वेळी योग्य संधी मिळाल्याने मोठे खेळाडू निर्माण होत असतात. त्यामुळे माझे मित्र धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी स्थानिक प्रतिभावान खेळाडूंना योग्य मंच उपलब्ध करून दिल्यानेच ग्रामीण मातीतून युवराज सिंग आणि झहीर खान सारखे खेळाडू घडत असतात असे गौरव उद्गार भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी काढले.
मी अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर मधून टेनिस बॉल पासूनच सुरुवात केली आणि पुढे खेळत गेलो. आज परळीत येऊन ग्रामीण भागात क्रिकेटचे एवढे भव्य आयोजन पाहून मला अतिशय आनंद झाला. परळीत खेळले जाणारे हे क्रिकेट एक दिवस देशात आणि देशाबाहेर नक्कीच पोहोचेल, असा मला विश्वास आहे, असे मत यावेळी भूतपूर्व भारतीय क्रिकेटर जहीर खान यांनी व्यक्त केले.
गेल्या 25 जानेवारीपासून परळी वैद्यनाथ शहरात धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 3500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ही माझ्यासाठी संयोजक म्हणून खूप मोठी बाब आहे, तसेच या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये मला अनेकांचे सहभागी लाभले त्या सगळ्यांचेच मी या माध्यमातून आभार मानतो, असे मत यावेळी संयोजकांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले.
दरम्यान नामदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण व शहर असे दोन वेगवेगळे फायनल खेळवण्यात आले. ग्रामीण मध्ये चांदापूर हा संघ विजेता तर शिवबा गोपीनाथ गड हा संघ उपविजेता ठरला तसेच शहर मध्ये जय श्रीराम संघ विजेता तर जे के सी सी हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघास एक लाख रुपये व ट्रॉफी तसेच उपविजेत्या संघास 51 हजार रुपये व ट्रॉफी असे बक्षीस ना.धनंजय मुंडे, युवराज सिंह, झहीर खान यांसह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या समारंभास ना. धनंजय मुंडे यांच्यासह भूतपूर्व भारतीय क्रिकेटर युवराज सिंह, भूतपूर्व भारतीय क्रिकेटर जहीर खान, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष तुळशीराम पवार, परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, अंबाजोगाई चे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, युवा नेते अभय मुंडे, सूर्यभान नाना मुंडे, प्रा. मधुकर आघाव, माणिकभाऊ फड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात प्लेअर ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बॅटिंग, बोलींग, अंपायर आदी सर्वांचाच सन्मान करण्यात आला. आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभय मुंडे, व्यंकटेश मुंडे, सुशील कराड, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, प्रणव परळीकर, अविनाश गवळी, प्रा. अजय जोशी, शेख मुसा, सय्यद मुस्तफा, उमेश नागरगोजे, बालाजी वाघ, विष्णू गीते, सुरेश गीते, बिलाल हुसेन, हाजी बाबा यांसह आदींनी परिश्रम घेतले.
पुढील वर्षी मतदारसंघातील 700 खेळाडूंची निवड करून परळी प्रीमियर लीग आयोजित करणार – धनंजय मुंडे
यावर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे साडेतीन हजार खेळाडूंनी क्रिकेटचा आनंद लुटला. यापैकी परळी मतदारसंघातल्या उत्कृष्ट खेळ दाखवलेल्या 700 खेळाडूंची निवड करून 20 संघांच्या माध्यमातून या खेळाडूंचा लिलाव करून पुढील वर्षी परळी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन याहीपेक्षा भव्य स्वरूपात करणार असल्याचीही घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
परळी वैजनाथ, (बातमीदार)ः- बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांत ओळख असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या महाशिवरात्री निमित्त येत्या शुक्रवार (दि.८) पासून भरणार्या यात्रा महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
यानिमित्ताने मंदिर व परिसरात रंगरंगोटी, दर्शन व्यवस्था, मंडप उभारणी, सी.सी.टी.व्ही. यांसह विविध कामे केली गेली आहेत. यात्रेनिमित्त दर्शनाला येणार्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून विविध उपाययोजना देवस्थान संस्थेच्या वतीने केल्या जात आहेत. गुरुवारी (दि.७) वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा होवून दर्शनाला सुरूवात होणार आहे. स्त्री-पुरुष भाविकांच्या वेगवेगळया रांगा मंदिरात असणार आहेत. शिवाय शंभर देणगी देवून विशेष दर्शन पासचीही व्यवस्था केली आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून दर्शन मार्गावर कापडी मंडप टाकला गेला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण यात्रा उत्सव व दर्शन व्यवस्थेवर सी.सी.टी.व्ही.कॅमेर्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहेत. यासाठी ८० वर सी.सी.टी.टी.व्ही.कॅमेरे मंदिर व परिसरात लावण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची रूद्राभिषेक पूजा होणार आहे. यात्रा उत्सवाची तयारी अंतिम असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थान संस्थेचे विश्वस्त राजेश देशमुख, सचिव प्रा.बाबासाहेब देशमुख यांच्यासह इतर विश्वस्त, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक उपक्रमात न्यू हायस्कूल शाळा तिसरी
परळी वैजनाथ, (बातमीदार)ः- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक उपक्रमात येथील उर्जानगर वसाहतीतील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू हायस्कूल शाळा परळी तालुक्यातून तिसरी आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर हे अभियान राबविले जात आहेत. राज्यातील जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. परळी तालुक्यातून कन्हेरवाडी केंद्रातून न्यू हायस्कूल शाळा प्रथम आली होती. त्यानंतर तालुक्यातून या शाळेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. तालुक्यात मराठी व सेमी माध्यमांच्या शाळेत अग्रेसर असलेली, मोठी विद्यार्थी संख्या असलेली व सतत दहावीच्या निकालात विक्रम नोंदविणारी शाळा म्हणून न्यू हायस्कूल शाळा ओळखली जाते. गेल्या ३५ वर्षापासून कार्यरत असलेली ही शाळा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेत सतत विविध उपक्रम राबवले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत न्यू हायस्कूल शाळेने सहभाग घेवून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले. परळी पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राने निवडलेल्या तज्ज्ञ परीक्षकांमार्फत शाळेची दोन वेळा तपासणी झाली. कन्हेरवाडी केंद्रातून ही शाळा पहिली आली तर परळी तालुक्यातून तिसरी आली आहे.
याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्यासह सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके, इतर सर्व सदस्य यांनी याबद्दल न्यू हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, या स्पर्धेत न्यू हायस्कूल शाळेची निवड केल्याबद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव मुंडे, गटशिक्षणाधिकारी श्री कनाके यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम, श्री कराड यांचे शाळेचे मुख्याध्यापक बी.ए. नाईकनवरे, पर्यवेक्षक बालासाहेब राठोड व शिक्षकवृंदांनी आभार मानले आहेत. हा उपक्रम संस्थेच्या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या मदतीने आम्ही यशस्वी करू शकलो असे मुख्याध्यापक श्री नाईकनवरे यांनी सांगितले.