/संपादकीय

संपादकीय

Spread the love

‘विकासतीर्थ’ भंगारात...

मराठवाड्याच्या विकासाचा एक भाग म्हणून मराठवाड्यात औष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. योग्य भौगोलिक परिसर, वीज केंद्रास लागणार्‍या कोळशाची वाहतूक करण्यासाठी रूंद रेल्वे मार्गाची सोय, मुबलक पाणी या सर्व जमेच्या बाबींमुळे मराठवाड्याच्या केंद्रस्थानी बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे हे वीज निर्मिती केंद्र उभारण्यावर शिकामोर्तब करण्यात आले. २९ मे १९६६ ला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शहरात गंगाखेड मार्गावर दोनशे चाळीस हेटर शेतजमीनीवर ३० मेगावॉट क्षमतेच्या मराठवाड्यातील पहिल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या कामाला सुरवात करण्यात आली. आजच्या भारत हेवी इलेट्रीक लिमिटेड (भेल) या सरकारी कंपनीच्या मदतीने या संचांच्या उभारणीचे काम सुरू झाले. तेंव्हा हेवी इलेट्रीकल या नावाने ही कंपनी ओळखली जात होती. त्यावेळी वीज निर्मिती संच उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही परदेशातून आणावी लागत असे. या संचातील बाष्पक व इतर कांही यंत्रसामुग्री ’फ्रॅन्कोटोसी’ या इटालीयन कंपनीकडून मागवण्यात आली तर जनित्रे हे भेलचेच लावण्यात आले. या संचाच्या उभारणीचे काम नोव्हेंबर १९७१ ला पूर्ण झाले तर १५ नोव्हेंबर १९७१ ला या संचातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरवात झाली. त्यावेळी जेष्ठ केंद्र अधिष्ठाता एस.पी.कडूसकर यांच्या देखरेखीखाली वीज केंद्राचे काम सुरू झाले होते. या संचातून तयार होणारी वीज १३२ केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीद्वारे त्या काळात बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांसह राज्यात इतर ठिकाणी वितरीत करण्यात आली. परळीच्या वीज निर्मिती केंद्रातून तयार झालेल्या वीजेने मराठवाड्याची वीजेची गरज भागली आणि मराठवाडा प्रकाशमय केला. पहिल्याच वर्षी या संचातून ३५ दशलक्ष युनीट वीजेची निर्मिती झाली. त्यानंतर याच संचाचा विस्तार करून आणखीन ३० मेगावॉट क्षमतेचा दुसरा संच येथे कार्यान्वित करण्यात आला. त्याचे काम वर्षभरात पूर्ण होवून मे १९७२ ला याही संचातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरवात झाली. त्यानंतर राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेवून येथील वीज निर्मिती केंद्राचा विस्तार करण्यात आला. २१० मेगावॅट क्षमता असलेल्या संच क्रमांक तीनच्या उभारणीला ऑक्टोबर १९८० ला सुरूवात झाली. तेवढ्या क्षमतेचा संच क्रमांक चार मार्च १९८५ ला सुरू झाला तर डिसेंबर १९८७ संच क्रमांक पाचच्या उभारणीचे काम हाती घेतले गेले. २०१० च्या शतकाच्या प्रारंभी २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक सहा त्यानंतर टप्प्याटप्प्याने तेवढ्याच क्षमतेच्या संच क्रमांक सात व आठची उभारणी करण्यात आली. या सर्व संचामुळे परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र महाविज निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जावू लागले व येथील सर्व वीजनिर्मिती केंद्राची क्षमता १४४० मेगावॅट एवढी झाली.

आणखी पाच-दहा वर्षे चांगल्या प्रकारे चालू शकतील अशी स्थिती असतानाही केंद्रातील ३० मेगावॉटचे दोन्ही संच बंद केले गेले. याच वेळी पाणी टंचाई व विजेची मागणी नसल्यामुळे केंद्रातील इतरही संच बंद ठेवले गेले. पुढे डिसेंबर २०१९ मध्ये २१० मेगावॉट क्षमतेचे तिन्ही संच कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय झाला. विजेचा उत्पादन खर्च अधिक, जुने होणे अशी कारण यासाठी दिली गेली. पुढे ३० मेगावॉटचे दोन्ही संच भंगारमध्ये काढले. त्यानंतर २१० मेगावॉट एवढी क्षमता असलेला संच क्रमांक तीनही भंगार मध्ये काढला गेला. 

या संचाची शेवटची खून असलेली धुरवाहिनी (चिमणी) जीची उंची सुमारे एकशे वीस फुट होती, ती सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली तर कालच्या गुरुवारी व शुक्रवारी (दि.२९ फेब्रुवारी व १ मार्च २०२४) प्रत्येकी २१० मेगावॉट क्षमता असलेले संच क्रमांक चार व पाचच्या धूरवाहिण्याही जमीनदोस्त करण्यात आल्या. याची उंची अनुक्रमे १८० व २१० मीटर एवढी होती. हे दोन्ही संच भंगारमध्ये काढले गेले आहेत.

आपल्या विजेने कधी काळी मराठवाड्याच्या व्यापार उद्योगाला चालना देणार्‍या, मागील कितीतरी दशके मराठवाडा उजळून काढणार्‍या व मराठवाड्याचे विकासतीर्थ म्हणून ओळख मिळवणार्‍या परळी औष्णिक वीज केंद्रातील जुने संच रुपी वैभव नष्ट होत चालले आहे. यामुळे परळीकरांसह हे केंद्र उभारणी करणार्‍या व या केंद्रात सेवा केलेल्या अधिकारी, कर्मचारी, कामगार व इतरांच्या मनाला चटका लागला आहे. 

दरम्यान, भंगारमध्ये काढल्या गेलेल्या जुन्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या जागेवर पुन्हा नवे संच उभारले जातात की या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प थाटला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.